प्रतिनिधी , औरंगाबाद : सिल्लोड,सिल्लोड महोत्सव 2023 तसेच महाराष्ट्र राज्याचे कृषिमंत्री ना. अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत सर्वरोग निदान व उपचार शिबिरात सिल्लोड सह जवळपासच्या जिल्ह्यातील विविध आजारांचे जवळपास 22हजार 300 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधोपचार देण्यात आला. तर दोन टप्यात घेण्यात आलेल्या महारक्तदान शिबिरात 555 जणांनी रक्तदान केले. विविध आजारांचे जवळपास 775 तज्ञ डॉक्टरांनीं या शिबिरात सहभाग घेतला होता. शहरातील महाराणा प्रताप चौकातील नॅशनल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलच्या मैदानात नगर परिषद सिल्लोड व उपजिल्हा रुग्णालय सिल्लोड तसेच ना.अब्दुल सत्तार मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षीप्रमाणे मोफत सर्वरोग निदान व उपचार तसेच महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याहस्ते दीपप्रज्वलन करून या शिबिराचे उदघाटन करण्यात आले. सर्व सामान्य जनतेला एकाच छताखाली आरोग्याच्या सर्व सुविधा मोफत मिळाव्यात या दृष्टीने दरवर्षी सिल्लोड येथे सर्वरोग निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले जाते. डॉक्टर्स , मेडिकल असोसिएशन व मित्र मंडळाच्या अथक परिश्रम व नियोजनातून दरवर्षी या शिबिराची व्याप्ती वाढत असून या शिबिरातून लाभ घेतलेल्या सामान्यांच्या चेहऱ्यावरील स्मित हास्य पाहून आत्मिक समाधान मिळत असल्याचे प्रतिपादन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी सर्वरोग निदान व उपचार शिबिर उद्घाटन प्रसंगी केले.तपासणी अंती शिबिरात आलेल्या गंभीर आजाराच्या रुग्णांना मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षातून सर्वोतोपरी मदत करण्यात येणार असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार यांनी स्पष्ट केले. सिल्लोड येथे उभारण्यात येणाऱ्या नॅशनल मेडिकल कॉलेज साठी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी भरीव मदत केली. येत्या वर्षभरात सिल्लोड येथे नॅशनल मेडिकल कॉलेज उभारण्याचा आमचा संकल्प असल्याचे ना. अब्दुल सत्तार म्हणाले.अब्दुल सत्तार यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी हे शिबीर आयोजित करण्यात येते. यावर्षी सिल्लोड महोत्सव साजरा होत असल्याने या शिबिराचा यात समावेश करण्यात आला. शिबिरात विविध आजारांचे तज्ञ डॉक्टर यांची यावेळी उपस्थिती होती. शिबिरात नोंदणी विभाग, अपघात विभाग, स्त्री रोग विभाग, हृदयरोग विभाग, नेत्र रोग विभाग, महालॅब, कोविड व गोवर लसीकरण तसेच औषध वितरण विभाग अशा प्रकारे विविध आजारांचे स्वतंत्र कक्षाची व्यवस्था करण्यात आल्याने रुग्णांची व्यवस्थित तपासणी करण्यात आली होती. त्यासोबतच अत्यावश्यक व खबरदारी उपाय म्हणून रुग्णवाहिका, अग्निशमन दल, व पोलीस मदत केंद्र या ठिकाणी उभारण्यात आले होते. तर शिबिरात येणाऱ्या रुग्णांसाठी ना. अब्दुल सत्तार मित्र मंडळाच्या वतीने जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान या शिबिरात उपस्थित डॉक्टर, धन्वंतरी असोशियशन तथा केमिस्ट अँड ड्रॅगीस्ट असोसिएशनचे पदाधिकारी , सदस्य व मान्यवरांचा उपनगराध्यक्ष अब्दुल समीर यांच्याहस्ते स्मृतिचिन्ह, पुष्पहार देवून सन्मान करण्यात आला.या शिबिरात मुंबई येथील जे जे हॉस्पिटल, नायर हॉस्पिटल, जसलोड हॉस्पिटल, पुणे येथील ससून रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय औरंगाबाद, एमजीएम वैद्यकीय महाविद्यालय, औरंगाबाद, धुत हॉस्पिटल,युनायटेड सिग्मा हॉस्पिटल, राष्ट्रीय आरोग्य अभियान, जिल्हा सामान्य रुग्णालय, जिल्हा परिषद आरोग्य विभाग, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष यांच्यासह धन्वंतरी डॉक्टर्स असोसिएशन, सिल्लोड मेडिकल असोसिएशन व सिल्लोड शहर व तालुक्यातील डॉक्टर्स, आशा सेविका सहभागी झाले होते.
