प्रतिनिधी , नवी दिल्ली : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे (Lokshahir Annabhau Sathe) यांच्या साहित्यिक योगदानासाठी आणि त्यांनी लोकहितासाठी केलेल्या कार्यासाठी त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा, अशी विनंती रिपाइंचे अध्यक्ष रामदास आठवले (Ramdas Athawale) यांनी पंतप्रधान मोदींना (PM Modi) पत्रातून केली आहे. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपले संपूर्ण आयुष्य कोणत्याही भेदभावाशिवाय सार्वजनिक कल्याणासाठी समर्पित केले होते आणि मला आनंद होत आहे की, हे वर्ष साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे जन्मशताब्दी वर्ष आहे.
महाराष्ट्र (Maharashtra) राज्य सरकारने त्यांच्या शताब्दी वर्षाच्या स्मरणार्थ टपाल तिकिटाचे प्रकाशन करून केंद्र सरकारच्या सहकार्याने गौरव केला आहे, असे आठवले यांनी पत्रात नमूद केले आहे. तसेच, ते लिहितात, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, महाराष्ट्राच्या प्रख्यात साहित्यिकाकडे मी तुमचे लक्ष वेधू इच्छितो! त्यांनी समाजातील वंचित घटकाला न्याय मिळवून देण्याचे काम केले. संयुक्त महाराष्ट्र चळवळ, गोवा मुक्ती संग्राम, त्यांच्या कवितेतून महत्त्वपूर्ण योगदान देऊन त्यांनी एक नवीन क्रांती घडविली होती. त्यांनी स्वातंत्र्योत्तरानंतर विविध राजकीय आणि सामाजिक प्रश्नांना पुन्हा जिवंत केले होते. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे साहित्यिक योगदानासाठी आणि त्यांनी लोकहितासाठी केलेल्या कार्यासाठी, आवश्यक कृती केल्याबद्दल त्यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा ही नम्र विनंती. असे पत्र रामदास आठवले यांनी पंतप्रधान मोदींना लिहिले आहे.
