प्रतिनिधी, जळगाव : मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात अवकाळी पाऊस गारपीट यामुळे शेतकरी भयभीत झाले होते. तर त्यानंतर आता अचानक तीव्र उष्णतेची लाट आल्याने या उष्णतेच्या लाटेमुळे केळी बागांवर त्याचा परिणाम होऊ लागला आहे. या 44 डिग्री सेल्सियस तापमानाचा फटका केळी बागांवर होत आहे. केळीचे पान सुकू लागले आहे, तयार झालेले केळीचे घड आपोआप घडू लागले, तर भविष्यात त्याच्या उत्पन्नात घट होण्याची दाट शक्यता आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांनी काय करावं हा प्रश्न निर्माण झालेला आहे. उष्ण हवा केळीच्या बागांमध्ये येऊ नये यासाठी आजूबाजूने ग्रीन नेट व महिलांच्या घरात पडलेल्या जुन्या साड्या लावून केळी बागा वाचवण्यासाठी शेतकरी राजा धडपड करीत आहे. ज्या शेतकऱ्यांनी विमा काढला आहे, अशा शेतकऱ्यांना विमा कंपन्यांमार्फत त्याचा मोबदला मिळू शकतो. परंतु, ज्या शेतकऱ्यांनी विमा काढलेला नाही अशा शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर फटका बसणार आहे. त्यासाठी शासनाने त्यांच्यासाठी देखील योजना लागू करून त्यांना मदत द्यावी अशी अपेक्षा शेतकरी वर्गाकडून होताना दिसत आहे.
