प्रतिनिधी, जळगाव : चोपडा तालुक्यात उन्हाळी भुईमुगाची लागवड शेतकऱ्यांनी कमी केली असल्याने भुईमूग शेंगांची आवक ही कमी आहे. दुकानावरील शेंगदाणे सर्वसामान्यांना परवडत नसल्याने वर्षभर वापरण्यासाठी 50 किलो , 60 किलो एक क्विंटल शेतकरी विकत घेत असतात. परंतु यावर्षी उन्हाळी भुईमूग शेंगाची आवक कमी असल्याने शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाच्या शेंगा विक्रीसाठी आणत असताना लिलावात व्यापारी कमी भाव मागत असल्याने शेतकरी घरगुती वापरासाठी घेणाऱ्या नागरिकांना 6800 तर 7000 रूपये क्विंटल ने देत आहे. यावर्षी भुईमूग लागवड कमी झाली आहे. त्याचबरोबर उत्पन्नही कमी झाले असल्याने त्याला मजुरी ही लागलेली आहे. त्यामुळे कमी भावात विक्री करणं परवडत नसल्याने नागरिकांना या भावात दिल्याने थोडाफार खर्च तरी निघत आहे अशी शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
