प्रतिनिधी, बीड : भाजपचे राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी सुषमा अंधारे यांच्या महाप्रबोधन यात्रेत झालेल्या भाषणावरून टीकास्त्र सोडले आहे. सुषमा अंधारे या गरिबासाठी काम करतात असा फार मोठा गैरसमज होता. मात्र काल झालेल्या महाप्रक्षोभक यात्रेत गरिबांसाठी शिंदे फडणवीस सरकारने सुरू केलेल्या योजनेची अंधारेंनी जाहीर चेष्टा करत लाभार्थी गरजूंचा अपमान केला असल्याचे कुलकर्णी यांनी म्हटले आहे. आनंदाचा शिधा नको म्हणत एसटी प्रवासात महिलांना दिलेल्या सवलतीचा देखील अंधारे यांनी विरोध केला. सुषमा अंधारे यांच्या या भूमिकेचा कुलकर्णी यांनी निषेध केला आहे.
