प्रतिनिधी, मुंबई : जी -२० परिषद अंतर्गत केंद्रीय पर्यावरण विभागांतर्गत ‘मेगा बीच क्लीन’ ड्राइव्हचे आयोजन मुंबईतील जुहू चौपाटीवर करण्यात आले होते. या कार्यक्रमात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः सहभागी होऊन समुद्रकिनारा स्वच्छ करण्यासाठी पुढाकार घेतला. जुहू चौपाटीवर जाऊन त्यांनी कचरा उचलून ह्या मोहिमेला आपला पाठींबा दर्शवला. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या स्वच्छता कामगारांशी संवाद साधून त्यांचे काम जाणून घेतले तसेच त्यांच्या कामाचे जाहीर कौतुकही केले. यावेळी जी-20 देशांमधून आलेल्या डेलिगेट्ससोबत त्यांनी संवाद साधला. तसेच या कार्यक्रमाच्या माध्यमातून राज्याची भूमिका देखील विशद केली.
