जनतेज न्युज

सुधागड-हातोंड ग्रामपंचायतीत लाखो रुपयांचा भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारात उघड; दोषींवर कारवाईची ग्रामस्थांची मागणी

प्रतिनिधी, रायगड : रायगडच्या सुधागड तालुक्यातील हातोंड ग्रामपंचायतीतील लाखो रुपयांचा भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारात उघड झाल्याने खळबळ उडाली आहे.अपंगांसाठी वस्तू खरेदी, शाळा वस्तू खरेदी, तसेच ग्रामपंचायतीसाठी संगणक खरेदी करण्यात आल्याचे दाखवण्यात आले आहेत. मात्र प्रत्यक्षात लाभार्थी पर्यंत त्या वस्तू पोहचल्याच नाहीत. येथील ग्रामस्थ सचिन भोसले आणि संजय कडू यांनी टाकलेल्या माहिती अधिकारात ही माहिती उघड झाली आहे. वर्ष 2017 ते 2022 या कार्यकाळात तत्कालीन सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या मार्फत झालेल्या कामातील भ्रष्टाचार माहितीच्या अधिकारातून उघड झाला आहे. वारंवार संबंधितांवर कारवाई साठी गटविकास अधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी  यांच्याकडे  पत्रव्यवहार केला आहे, मात्र अद्यापही संबंधितांवर कोणतीही कारवाई न झाल्याने प्रशासन दोषींना पाठीशी घालत आहे का? असा संतप्त सवाल हातोंड ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. तत्कालीन सरपंच, ग्रामसेवकांवर गुन्हा दाखल करा, गटविकास अधिकारी यांना निलंबित करावे अशी मागणी  विद्यमान सरपंच रमेश वाघमारे ,उपसरपंच नितीन वाघमारे आणि ग्रामस्थांनी केली आहे. कारवाईच्या मागणीसाठी आक्रमक पावित्रा घेत ग्रामस्थांनी येत्या 20 नोव्हेंबर पासून  पाली पंचायत समिती कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे.