प्रतिनिधी , कोरोनाच्या काळात सर्वसामान्य माणसाची परिस्थिती खालावलेली असून त्यांना परिवाराचा गाडा चालविणे मुश्किल होत आहे. त्यातच मुलांच्या शिक्षणाच्या फी चा अतिरिक्त बोजा हा सर्वसामान्य माणसाला परवडणारा नसल्याने पालकांच्या तीन महिन्याच्या शाळांच्या फी माफीबाबत राष्ट्रवादी पक्ष सरसावला आहे. मुंब्र्यातील उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या शाळांच्या संचालकांशी बैठक घेऊन तीन महिन्याची फी माफीला ६९ शाळांची मंजुरी मिळवल्याची माहिती राष्टवादी नगरसेवक शानू पठाण यांनी दिली. मुंब्रा परिसरात असलेल्या खाजगी शाळांच्या संचालकांशी चर्चा करून मुलांच्या कोरोनाच्या काळातील तीन महिनायची फी माफी मिळावी यासाठी राष्ट्रवादी पदाधिकारी हे राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली प्रयत्न करीत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे. मुंब्रा परिसरात असलेल्या ९० टक्के शाळांच्या संचालकांशी राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने चर्चा करून तीन महिन्याच्या फी सह अतिरिक्त सर्व शुल्क माफ करण्याच्या राष्ट्रवादीच्या प्रस्तावाला शाळा संचालकांनी मंजुरी दिल्याची घोषणा मुंब्रा राष्ट्रवादी कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली. यामुळे मुंब्रा परिसरातील इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंब्रा परिसरात असलेल्या उर्दू, इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील तब्बल ६९ शाळांनी फी माफीच्या प्रस्तावाला मंजुरी दिली. तर अन्य शाळांचे संचालक हे चर्चेसाठी उपलब्ध नसल्याने त्यांच्याशी चर्चा होऊ शकलेली नाही मात्र अन्य शाळेप्रमाणे उर्वरित शाळाही तीन महिनायची फी माफ करण्यासाठी तयार होतील असा आशावाद हा राष्ट्रवादी नगरसेवक अशरफ शानू पठाण व्यक्त केला आहे
