प्रतिनिधी , सोलापूर : ऊस उत्पादकांचा जिल्हा अशी सोलापूर जिल्ह्याची आजपर्यंतची प्रमुख ओळख आहे मात्र आता ती ओळख पुसून टाकण्यासाठी विठ्ठलगंगा फार्मर प्रोड्यूसर कंपनीची स्थापना करण्यात आलीय. ऊसाला पर्यायी पीक म्हणून जिल्ह्यातील शेतकरी फळबागा आणि भाजीपाला क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणात आकर्षित झालेला आहे. मात्र शेतकऱ्यांच्या या मालाला योग्य बाजारपेठ आणि योग्य तो दाम मिळणे आवश्यक बनलेले आहे. त्यामुळे ही कमतरता भरुन काढण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यात भव्य अशी फार्मर प्रोड्युसर कंपनीची स्थापना करण्यात आलीय. या कंपनीच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा फळं आणि पालेभाज्या परदेशात निर्यात केल्या जाणार आहेत. त्याचबरोबर कंपनीच्या सभासद शेतकऱ्यांना कमी दरात खतं, बी- बियाणे, शेती अवजारे आदी वस्तूं एकाच छताखाली आणि स्वस्त दरात देण्यात येणार आहेत. या कंपनीमुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल अशी अपेक्षा राष्ट्रीय द्राक्ष संशोधन केंद्र पुण्याचे संचालक आर. जी सोमकुंवर यांनी व्यक्त केलीय.
