प्रतिनिधी , शिरपूर : शेतकऱ्यांच्या संदर्भात केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या वक्तव्याचा विरोधी पक्षांनी निषेध केला आहे.या यावेळी काँग्रेस,भाकप,प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. तसेच उपविभागीय अधिकारी यांना रावसाहेब दानवे यांनी राजीनामा घेणे बाबत निवेदन देण्यात आलेले आहे.
कृषीविषयक कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांनी नवी दिल्ली येथे आंदोलन चालवले आहे. अनेक दिवसांपासून कडाक्याच्या थंडीत बळिराजा तेथे संघर्ष करीत ठामपणे उभा आहे. मात्र अद्याप शासन तोडगा काढू शकले नाही. एकीकडे चर्चा सुरू असतांना भारतीय जनता पक्षाचे काही नेते शेतकरी आंदोलनाविषयी जनतेत संभ्रम निर्माण होईल किंवा आंदोलन बदनाम होईल अशी वक्तव्ये मुद्दामच करीत आहेत.
भाजपचे नेते व केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी या आंदोलनामागे चीन आणि पाकिस्तानचा हात आल्याचे वादग्रस्त वक्तव्य केले आहे. यापूर्वीही दानवे यांनी शेतकऱ्यांना उद्देशून हीन दर्जाची वक्तव्ये केली असून ते नेहमीच शेतकरी हिताच्या विरोधात असल्याचे दिसून आले आहे. त्यांच्या या विकृतीचा निषेध करण्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांनी आंदोलन करीत दानवे यांनी मंत्री व खासदार पदाचा राजीनामा द्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.
या आंदोलनात काँग्रेस, प्रहार जनशक्ती,भाकपा पक्षातर्फे शहरातील पाचकंदिल चौकात रावसाहेब दानवे यांच्या प्रतिकात्मक प्रतिमेला जोडे मारण्यात आले.यावेळी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मनोहर पाटील, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष ईश्वर बोरसे भाकपचे संतोष पाटील, शेतकरी फाउंडेशनचे अध्यक्ष मोहन पाटील, काँग्रेसचे शहराध्यक्ष उत्तमराव माळी, प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा सचिव स्वप्नील राजपूत, काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अभिमान भोई, शेतकरी फाऊंडेशनचे गोपाल राजपूत, शिवसेनेचे रजेसिंग राजपूत, सामाजिक कार्यकर्त्या सरोज पाटील, प्रहारचे उपाध्यक्ष मनोज राजपूत, शेतकरी भोजेसिंग गिरासे, भाकपचे मदन परदेशी, योगेश जोशी यांचा आंदोलनात सहभाग होता.
