जनतेज न्युज

कोव्हिड-१९ लसीकरणासाठी सज्ज राहा,तीन टप्यात होईल लसीकरण.

प्रतिनिधी , नागपूर : गेल्या दहा महिन्यांपासून कोविड-१९ अर्थात कोरोना नावाची भीती प्रत्येकाच्या मनात आहे. मात्र आता कोरोनाचा वर लस येणार असल्याने प्रत्येकाला या लशीची आतुरता आहे.त्यामुळे ज्यावेळी प्रत्यक्षात लस उपलब्ध होईल,त्यावेळी त्याचे नियोजन कसे केले जाणार या संदर्भात देखील शासन आणि प्रशासना कडून तयारी केली जात आहे. या संदर्भात नागरी टास्क फोर्स समितीच्या बैठक बोलवण्यात आली होती,ज्यामध्ये नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी यांनी तयारीचा आढावा घेतला आहे. लसीकरणासंदर्भात केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचना जारी झाल्या आहेत. लसीकरणाची प्रक्रिया कधीही सुरू होऊ शकते. त्यासाठी शहरातील संपूर्ण यंत्रणेने सज्ज राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी केले आहे.
कोव्हिडच्या काळात आरोग्य विभागाच्या अधिकारी, कर्मचारी यांनी उत्कृष्ट काम केले आहे. त्यानंतरचा टप्पा म्हणजे लसीकरणाचा आहे. ही जबाबदारीही त्यांनाच पार पाडायची आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात आरोग्य कर्मचारी, दुसऱ्या टप्प्यात फ्रंट लाईन वॉरिअर्स यांचे लसीकरण करण्यात येणार आहे. त्यामुळे या दोन्हीचा डाटा बेस तातडीने तयार करावा अश्या सुचना त्यांनी संबंधित विभागांना दिल्या आहेत. एवढंच नाही तर झोन निहाय खासगी रुग्णालयांकडूनही तातडीने माहिती मागवावी,असे निर्देश त्यांनी दिले आहेत. लसीकरणासाठी शासनाच्या निर्देशानुसार आवश्यक असलेल्या लसीकरण केंद्राची माहिती, त्याची चाचपणी, आवश्यक असलेल्या सोयी, आवश्यक असलेली कोल्ड चेन याबाबतचा अहवाल आठवडाभरात देण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना दिले.