जनतेज न्युज

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून प्राचार्यांना घेराव,अणे महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याचा आरोप

प्रतिनिधी , यवतमाळ : लोकनायक बापूजी अणे महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून अतिरिक्त शुल्क आकारल्याचा आरोप होत आहे. याचकारणावरून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने महाविद्यालयात धडक देऊन प्राचार्य योगेश कुंटे यांना घेराव घातला. कोरोना काळात महाविद्यालयीन शुल्क कमी करावे याकरिता अभाविपने आंदोलन केले होते. अमरावती विद्यापीठाने ही मागणी मान्य केली. तरीही अणे महिला महाविद्यालयाने विद्यार्थिनींकडून सायकल स्टँड, आय कार्ड, हेल्थ, सुरक्षा व सुविधा शुल्क उकळले. या सुविधांचा विद्यार्थिनीनी लाभ घेतला नसतानाही त्यांच्यावर आर्थिक भुर्दंड लादला गेला. ईमारत बांधकाम निधीच्या नावाखाली देखील महाविद्यालयाने पैसे घेतले असून ते विद्यार्थिनींना परत द्यावे, अशी मागणी यावेळी अभाविपने केली. यापूर्वी अभाविप शिष्टमंडळाने यासंदर्भात निवेदन दिले असता प्राचार्य दुर्गेश कुंटे यांनी उडवाउडवीची उत्तरं देत अपमानास्पद वागणूक दिली तसेच प्रतिष्ठित व्यक्तींच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप अभाविपने केला. मागणी पूर्ण करण्याचे आश्वासन दिल्यानंतर अभाविपने आंदोलन मागे घेतले.