प्रतिनिधी , सिंधुदुर्ग : राज्य शासनाने मॅग्नेटिक महाराष्ट्र अंतर्गत करोडोची गुंतवणूक होणार असल्याचे जाहीर केले आहे. यात कोकणात 77 टक्के गुंतवणूक होणार असल्याचे सांगण्यात आले. मात्र, कोकणात होणाऱ्या या ७७% गुंतवणुकीत सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात एकही रुपयाची गुंतवणूक नाही. जिल्ह्यात येणार्या प्रकल्पांना विरोध, गुंतवणुकीत जिल्ह्यासाठी एक रुपयाही नाही असे असेल तेथील तरुण-तरुणींनी काय करावे? सरकार सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यातील जनतेवर सुड उगवत आहे असा आरोप करतानाच चिपी विमानतळाच्या माध्यमातून निर्माण होणाऱ्या नोकऱ्या या जिल्ह्यातील स्थानिक लोकांनाच मिळाल्या पाहिजेत. बाहेरच्यांना येथे नोकऱ्या करू देणार नाही, असा इशाराही आमदार नितेश राणे यांनी दिला आहे. कणकवली प्रहार भवन येथे आयोजित पत्रकार परिषद ते बोलत होते.
