जनतेज न्युज

पांदण रस्त्यासाठी बेलगुडवाडी ग्रामस्थांचे महिला लेकरा-बाळांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण.

प्रतिनिधी , बीड : बीडच्या गेवराई तालुक्यातील मौजे बेलगुडवाडी येथील 60 ते 70 शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असून याबाबत अनेकवेळा लोकप्रतिनिधी व प्रशासनाला निवेदने देऊन पाठपुरावा केला. मात्र, याबाबत कुठलाच निर्णय न झाल्याने येथील शेतकऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले असून आज सकाळपासून गेवराई तहसील कार्यालयासमोर महिला व मुलाबाळांसह येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे.
बेलगुडवाडी शिवारातील गट क्रमांक 86 मधील पूर्वीपासून रहदारी असणारा पांदण रस्ता काही शेतकऱ्यांनी नि अडविल्यामुळे येथील अनेक शेतकऱ्यांचा ऊस या रस्त्यामुळे शेतात उभाच असून वाहतुकीला अडचण निर्माण होत आहे. याबाबत प्रशासनाकडे अनेकवेळा पाठपुरावा करून, हा रस्ता मोकळा करून द्यावा अशी मागणी केली, परंतु प्रशासनाने व संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्यामुळे या शेतकऱ्यांनी लोकशाही मार्गाने आंदोलन करण्याचा इशारा प्रशासनाला निवेदनातून दिला होता. परंतु प्रशासनाकडून याची दखल न घेतल्याने आज दि.28 रोजी येथील सर्व ग्रामस्थांनी महिला व मुलाबाळांसह तहसिल कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले असून आमच्या रस्त्याचा प्रश्न तात्काळ मार्गी लावल्याशिवाय आम्ही या ठिकाणाहून उठणार नसल्याचा आक्रमक पवित्रा या ग्रामस्थांनी घेतला आहे. मात्र, यावर तहसील प्रशासनाने बोलण्यास टाळले आहे.