प्रतिनिधी , नांदेड : बरबडा येथील नामांकितं आडत व्यापारी व बाजार समितीचे संचालक सदाशिव पाटील पचलीग व मोहन पचलीग यांच्या गोदामातून सोयाबीन चोरणाऱ्या चोरट्यांना पकडण्यात कुटूंर पोलीसांना यश आलं आहे. या पाचही तरुणांना पोलीसांनी जेरबंद केले आहे. यात एका प्रतिष्ठित व्यापाऱ्याचा मुलाचा समावेश असल्याने बरबडा गावात एकच खळबळ उडाली आहे. २४ डिसेंबर रोजी या पाचही तरुणांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसाची पोलीस कोठडी नायगाव न्यायालयाने सुनावली आहे. बरबडा येथील आडत व्यापारी सदाशिव पचलीग व मोहन पचलीग यांच्या गोदामातील १लाख ४२ हजार ८०० रु. किंमतीचे ६८ पोते सोयाबीन १६ डिसेंबर रोजी गोदामातून टेम्पोत भरून लंपास केले होते. दुसऱ्या दिवशी ही घटना उघडकीस आल्या नंतर बाजार पेठेत एकचं खळबळ उडाली. सपोनी करीम पठाण,पोलीस उपनिरीक्षक जांभुळकर, बिट जमादार नागोराव पोले,भार्गव सुवर्णकार आणि विजय अवुलवार यांनी या चोरीचा बारकाईने अभ्यास करुन गोपनीय यंत्रनेच्या मदतीने चोरांना शोधून काढले. चोरी करणाऱ्या या पाचही तरुणांमध्ये एक तरुण परिसरातील एका प्रतिष्ठीत व्यापाऱ्याचा मुलगा व अन्य तरुणही गावातीलचं असल्याचे समोर आल्यावर, पोलीसांनी पुर्ण शहानिशा तसेच पुराव्यांची खातरजमा करुनचं या पाचही जणांना ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस निरीक्षक करीम पठाण यांनी दिली.
