प्रतिनिधी , कोल्हापूर : कोल्हापूरच्या कागल तालुक्यातील बोरवडे गावातल्या दत्तनगर मध्ये धोंडीराम काशीद कुटुंबीयांसह राहतात. ग्रामसेवक असलेल्या धोंडीराम काशीद यांनी कोरोनापासून बचावासाठी सॅनिटायझरच्या काही बाटल्या घरात आणल्या आहेत. 27 डिसेंबरला धोंडीराम यांचा पत्नी सुनिता काशीद नेहमीप्रमाणे आपला घरातील कचरा जाळण्यासाठी बाजूच्या मोकळ्या जागेत घेऊन गेल्या. या कचऱ्याच्या बाटलीत नजरचुकीने अर्धवट संपलेली सॅनिटायझरची सुद्धा होती. इतर कचरासोबत सॅनिटायझर बाटलीने सुद्धा पेट घेतला आणि त्याचा अचानक स्फोट झाला. या स्फोटाची आग सुनीता यांच्या गाऊनला लागली आणि या दुर्घटनेत या 80 टक्के भाजल्या गेल्या. स्फोटाच्या मोठ्या आवाजाने बाहेर आलेल्या कुटुंबीय आणि शेजाऱ्यांनी त्यांना तातडीने कोल्हापूर मधल्या सिपीआर रुग्णालयात दाखल केलं
या दुर्घटनेत जखमी झालेल्या सुनिता काशीद आठ दिवस मृत्यूशी झुंज देत होत्या.अखेर रविवारी सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेन परिसरात हळहळ व्यक्त होतेय. कोरोना काळात ग्रामपंचायत तसेच सामाजिक संस्थांनी दिलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या आता संपल्या आहेत. त्यामुळे अशा बाटल्या आता यंत्रणांनी जमा करून घ्याव्यात अशी मागणी या घटनेनंतर होऊ लागलीय.
कोरोनाचा कहर कमी झाल्यानंतर सॅनिटायझरचा वापरही बऱ्याच अंशी कमी झालाय. त्यामुळे आजही घराघरात अशा अर्धवट संपलेल्या सॅनिटायझरच्या बाटल्या आढळून येतात.या बाटल्यांची योग्य विल्हेवाट लावली नाही तर त्याचे किती गंभीर परिणाम होऊ शकतात याचा एक उदाहरण म्हणावे लागेल.
