औरंगाबादच्या अंजली कोला-पोर्जे ठरल्या मिसेस एशिया युनिव्हर्स २०२१’ च्या मानकरी
महाराष्ट्राची मान उंचावणारी कामगिरी, जगभरातून ६० महिलांचा होता सहभाग
प्रतिनिधी , औरंगाबाद : मिसेस युनिव्हर्स प्रा. लि. तर्फे ब्युटी पिजंट स्पर्धेचे आयोजन केले जाते. विवाहित महिलांसाठी असलेल्या या आंतरराष्ट्रीय स्पर्धेच्या पाचव्या श्रेणीत औरगाबादच्या अंजली कोला-पोर्जे मिसेस युनिव्हर्स २०२१च्या मानकरी ठरल्या आहेत. लग्नानंतर महिलांवर असंख्य बंधने येत असतात. त्यावर मात करून व सर्वांना सोबत घेऊन आपले स्वप्न पूर्ण करता येते. त्यासाठी आत्मविश्वास आवश्यक असतो, असे मत अंजली कोला-पोर्जे यांनी हॉटेल विट्स येथे रविवारी (ता १०) पत्रकार परिषदेत व्यक्त केले.
अंजली कोला-पोर्जे म्हणाल्या की, या स्पर्धेचे हे पाचवे वर्ष होते. कोरानामुळे बरीच बंधने या स्पर्धेवर आलेली होती. त्यामुळे स्पर्धेच्या ऑडिशन ऑनलाईन पद्धतीने पार पडल्या. त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने नोंदणी करण्यात आली. आठ महिन्याच्या प्रक्रियेनंतर जगभरातील ५० महिलांची या स्पर्धेसाठी निवड झाली. ग्रँड फिनाले राजस्थानमधील जयपूर येथे हॉटेल फर्न येथे आयोजित करण्यात आला होता. ग्रँड फिनालेमधून मिसेस प्लस, मिसेस एशिया, मिसेस अर्थ, मिसेस साऊथ एशिया, मिसेस यूरो एशिया युनिव्हर्सची ज्यूरींनी निवड केली. त्यापैकी मिसेस एशिया युनिव्हर्स २०२१ चा क्राऊन आणि किताब मला मिळाला.
माझ्यासारख्या सर्वांना समर्पित
औरंगाबादसारख्या शहरात पहिल्यांदाच हा किताब मिळाला आहे. येत्या काळात यांसारख्या स्पर्धा आयोजित करून महिलांना ब्युटी पिजंट स्पर्धेसाठी तयार करण्याचे स्वप्न आहे. त्याचबरोबर मी स्वतः जगभरातील ब्युटी पिजंट स्पर्धांमध्ये सहभागी होऊन भारतीय संस्कृतीचा प्रचार-प्रसार करणार आहे. हा क्राऊन आणि टायटल माझ्यासारख्या सर्व महिलांना समर्पित आहे. आत्मविश्वास असेल तर वय, उंची आणि तुम्ही कुठे राहता या बाबी दुय्यम ठरतात, त्यामुळे औरंगाबाद व मराठवाड्यातील महिलांनीही यांसारख्या स्पर्धामध्ये सहभागी व्हायला हवे.
