जनतेज न्युज

अवघ्या 28 वर्षाच्या वयात तब्बल 17 गुन्हे दाखल असलेला सराईत गुन्हेगार बाचक्या पोलिसांच्या जाळ्यात…

प्रतिनिधी, धुळे : धुळे शहरातील अरिहंत भवनाजवळ घडलेल्या घरफोडीची उकल करण्यात आझाद नगर पोलिसांना यश आले आहे. केवळ चार तासांतच गुन्हा उघडकीस आणून घरफोडी करणारा अवघ्या 28 वर्षाचा ‘बाचक्या’ जेरबंद झाला आहे. त्याच्यावर तब्बल 17 गुन्हे दाखल आहेत. ही कौतुकास्पद कामगिरी करणाऱ्या आझाद नगर पोलिसांनी त्यांच्याकडून मुद्देमालही हस्तगत केला आहे. याबाबत पोलिसांनी अधिक माहिती दिली की, राजेंद्र उत्तमचंद कटारीया वय वर्ष 64 रा. मोहन नगर, शिवमहिमा अपार्टमेंट, अरिहंत भवन समोर, धुळे हे पत्नीसह उपचारांसाठी मुंबई येथे गेले होते. याचाच फायदा घेऊन चोरट्या बाचक्या ने घरावर हाथ साफ केला. त्यानंतर त्यांच्या घरातील लाईट चालू असल्याचे अपार्टमेंटमधील नागरिकांना दिसले, त्यामुळे अपार्टमेंटमधील रहिवाशांनी घरात जाऊन बघितले असता, घरात चोरी झाल्याची बाब समोर आली. अपार्टमेंटमधील रहिवाशांनी ही माहिती घरमालक राजेंद्र कटारीया यांना फोनद्वारे दिली. त्यानुसार धुळे पोलिसांनाही लगेच कळविण्यात आले. पोलिसांनी घरमालकांचा पुतण्या दिनेश कटारीया यांच्या मदतीने घटनास्थळाची पाहणी केली. तेव्हा घरातील वस्तू विखुरलेल्या दिसल्यात. शिवाय, कपाटाची तिजोरी फोडून 63 हजार रुपयांची रोकड लंपास केल्याचे आढळून आले. आझाद नगर पोलिसांनी अपार्टमेंटमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता त्यात एक जण पहाटे 4 ते 4:30 वाजेच्या सुमारास राजेंद्र कटारीया यांच्या घराच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरी करुन निघाल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी लागलीच तपासाची चक्रे वेगाने फिरवून अवघ्या काही तासातच आरोपीला जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले आहे. आझाद नगर पोलिसांनी संशयिताची ओळख पटवली असता तो इम्रान उर्फ बाचक्या खालीद शेख वय वर्ष 28 रा. अजमेरा नगर, धुळे हा असल्याची खात्री झाली. सराईत असलेल्या बाचक्याच्या मुसक्या आवळण्यासाठी पोलिसांनी कसोशीने प्रयत्न केले. अवघ्या चार तासांतच त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलिसांनी आपला खाक्या दाखवताच बाचक्याने गुन्ह्याची कबूली देत त्याच्याकडील 52 हजार रुपयांची रोकड, गुन्ह्यात वापरलेली लोखंडी टॅमी व पसार होण्यासाठी वापरण्यात आलेली 70 हजार रुपये किमतीची पल्सर गाडी पोलिसांनी ताब्यात घेतली आहे.