प्रतिनिधी, नंदुरबार : बस स्थानकावर प्रवाशांसाठी सार्वजनिक पिण्याची पाण्याची व्यवस्था फक्त नावालाच असल्याचे दिसून आले आहे. नंदुरबार रेल्वे स्थानकावर काही प्रमाणात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे परंतु बस स्थानकावर कोणत्याही प्रकारे पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने प्रवाश्यांना पाणी विकत घेऊन प्यावे लागते. बसस्थानक व रेल्वे स्टेशन वर पिण्यायोग्य पाणी राहत नाही म्हणून प्रवाशी बाटलीबंद पाणी घेतात. परंतु नंदुरबार बस स्थानकावर शासनामार्फत दोन ठिकाणी वॉटर प्युरीफायर लावण्यात आले आहे. परंतु त्याची स्थिती पाहिली तर अत्यंत दयनीय आहे. एक तर बंद आहे आणि दुसऱ्या ठिकाणी घाणीचे साम्राज्य आहे. पावसामुळे साथीच्या आजारांनी थैमान घातले असतांना बस स्थानकावर मात्र कोणत्याच प्रकारचे सुविधा नसल्याने प्रवाशी बाटलीबंद पाणी विकत घेऊन पीत आहे. स्थानक अधिकाऱ्यांनी यासंबंधी बोलण्यास नकार दिला . प्रवासी संघटनेने या संदर्भात वारंवार पाठपुरावा केला तरी देखील बस स्थानक परिसरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध होत नाही. परिवहन विभागाची नाथजल योजना आहे. त्या अंतर्गत पाणीबंद बॉटल पंधरा रुपयात विक्री होत असल्याने त्याची विक्री वाढविण्यासाठी आर ओ वॉटर फिल्टर बंद असल्याचा आरोप प्रवासी संघटनेतर्फे करण्यात आला आहे. परंतु बस स्थानकात दोन वॉटर प्युरिफायर आहेत ,एक बंद आहे व एका ठिकाणी अत्यंत घाणीचे साम्राज्य असल्याने कोणीही प्रवासी तेथून पाणी पीत नाही त्यामुळे प्रवाशांचे हाल होताना दिसत आहे.
