प्रतिनिधी, सोलापूर : बार्शी तालुक्यात जवळगाव, हिंगणी आणि ढाळे पिंपळगाव प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरून वाहताहेत.धरण क्षेत्र परिसरात अतिवृष्टीत होऊन नागझरी, भोगावती,राम आणि नीलकंठा नद्यांची पात्रे भरून वाहत आहेत. काही ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.सोयाबीन, कांदा, द्राक्ष, मका पिकांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली.
या नद्यांवरील ढाळे पिंपळगाव मध्यम प्रकल्प, बार्शीच्या पूर्व दिशेला असलेला हिंगणी मध्यम प्रकल्प आणि जवळगाव मध्यम प्रकल्प हे दोन्ही प्रकल्प वैरागपासून जवळ आहेत. हिंगणी मध्यम प्रकल्प तीन दिवसांपासून पूर्ण क्षमतेने भरुन वाहतो.
अनेक ठिकाणी शेतातील माती वाहून गेली आहे. सोयाबीनचे उभे पीक काळे पडून मातीमोल झाले आहे. छाटणी केलेल्या द्राक्ष बागांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. सतत पडणा-या पावसाने शेतकरी मात्र हवालदिल झाला आहे. संकटात सापडलेल्या बळीराजाला नुकसानभरपाई रक्कम देऊन आर्थिक आधार द्यावा अशी मागणी पुढे येत आहे.
