प्रतिनिधी, जळगाव : चोपडा शहरा पासून येवला रस्त्याकडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या हिरा कॉटन जिनिंगच्या कार्यालया मधून चार अज्ञात चोरट्यांपैकी दोन अज्ञात चोरट्यांनी कार्यालयामध्ये प्रवेश करून आठ लाख 17 हजार रुपयाचे रोख रक्कम चोरून नेली. सदर चोरीची घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली असली तरी चोरटयांनी चेहऱ्यावर रुमाल लावलेला आहे. हिरा कॉटन जिनिंग चे मालक सुनील जैन यांच्या फिर्यादीवरून चोपडा शहर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर गुन्ह्या संदर्भात पोलीस उप अधीक्षक ऋषिकेश रावले, पोलीस निरीक्षक के के पाटील व कर्मचारी यांनी रस्त्यावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. सदर गुन्ह्याचा तपास लवकर लावण्यासाठी प्रयत्न करीत असल्याचे पोलीस निरीक्षक के के पाटील यांनी सांगितले आहे.
