प्रतिनिधी, कल्याण : एका नागरीकाला मारहाण करुन त्याची चैन आणि पैसे लुटणाऱ्या दोन चोरट्यांना कल्याण बाजारपेठ पोलिसांनी अटक केली आहे. या दोघांकडून बाईक चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहेत. यांच्याकडून चोरी केलेली चैन, रक्कम आणि तीन बाईक हस्तगत करण्यात आल्या आहेत. ५ नोव्हेंबरच्या दिवशी कल्याण पश्चिमेतील बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नागरीकाला मारहाण करुन त्याच्याकडून महागडी चैन आणि त्याची पर्स ज्यामध्ये दहा हजार रुपये होते ते दोन बाईक स्वार तरुण घेऊन पसार झाले. ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली होती. सीसीटीव्हीत दिसणारे चोरटे आणि गाडी नंबरच्या सहाय्याने कल्याणच्या बाजारपेठ पोलिसांनी शोध सुरु केला. अखेर या प्रकरणात दोघांना पाोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या दोघांनी कल्याणच्या खडकपाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीत आणि शांतीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत बाईक चोरी केली होती. त्या बाईक देखील पोलिसांनी हस्तगत केल्या आहेत.
