प्रतिनिधी, धुळे : धुळे शहराचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला पाणीचा प्रश्न पुन्हा पेटण्याची चिन्हे आता पुन्हा निर्माण झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून अनेक सामाजिक संघटना, पक्ष धुळेकरांना दोन दिवसा होईना मात्र पाणी मिळावे यासाठी आंदोलने करीत आहे. मात्र धुळे मनपा या जिव्हाळ्याच्या प्रश्नाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करत सामाजिक कार्यकर्त्यांनी देवपूर भागातील असलेल्या क्षीरे कॉलनीतील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे.
धुळे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विविध जलप्रकल्पांमध्ये सध्या पुरेसा पाणी साठा उपलब्ध असताना देखील दुसरीकडे नागरिकांना पाहण्यासाठी वणवण करावी लागत आहे. पाणीपुरवठा बाबत योग्य नियोजन करण्याचे वारंवार धुळे मनपा प्रशासनाकडून आदेश देऊन देखील त्यावर ठोस अंमलबजावणी होत नसल्याने नागरिकांना पाणी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. ऐन पावसाळ्यात नागरिकांना 10 ते 12 दिवसात पाणीपुरवठा होत असून तो देखील मोठ्या प्रमाणावर अशुद्ध होत आहे. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांकडून वारंवार तक्रारी केल्या जात आहेत तसेच अशुद्ध पाणीपुरवठ्यामुळे साथीचे आजार वाढले असून याकडे मनपा प्रशासन मात्र पूर्णतः डोळेझाक करीत असल्याचे चित्र सध्या धुळे शहरात पाहायला मिळत आहे.
धुळेकरांना दोन दिवसाआड पाणीपुरवठा सुरळीत करून द्यावा, तसेच स्वच्छ पाणी मिळावे यासाठी आज सामाजिक कार्यकर्ता प्रभाव परदेशी यांच्यासह देवपूर परिसरातील नागरिकांनी देवपूर परिसरातील क्षिरे कॉलनी येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले आहे. यावेळी परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते येणाऱ्या काळात पाणी प्रश्न हा पूर्णतः सोडवण्यात आला नाही, तर यापेक्षा देखील तीव्र आंदोलन छेडण्यात येईल व त्याच्या होणाऱ्या सर्व परिणामास धुळे मनपा प्रशासन जबाबदार असेल असा गंभीर इशारा यावेळी त्यांनी दिला.
