जनतेज न्युज

घाटी रुग्णालय हे फक्त पोस्टमार्टमसाठी राहिलेलं असं वाटत आहे – खा. इम्तियाज जलील

प्रतिनिधी , औरंगाबाद : मराठवाड्यासह १४ जिल्ह्यांतील रुग्णांची आरोग्य व्यवस्था अवलंबून असलेले औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयाची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे. रुग्णालयात मुबलक प्रमाणात औषधी उपलब्ध नसल्याने येणाऱ्या रुग्णांच्या नातेवाईकांना बाहेरील मेडिकल दुकानातून औषधी विकत घ्यावे लागत असल्याचे निदर्शनास आले आहे. एकीकडे औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयात औषधे उपलब्ध नसताना दुसरीकडे सरकार मात्र नवनवीन रुग्णालयांच्या इमारती बांधण्यात व्यस्त आहे. औरंगाबाद शहरातील घाटी रुग्णालयावर महाराष्ट्रील १४ जिल्ह्यातील रुग्णांचे आरोग्य अवलंबून आहे. परंतु या रुग्णालयात मोठ्या प्रमाणावर सुविधांचा अभाव आहे. बाहेरगावाहून येणाऱ्या रुग्णांना तसेच नातेवाईकांना याचा नाहक त्रास सहन‌ करावा लागतो. रुग्णांच्या नातेवाईकांना डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधी बाहेरील मेडिकल दुकानातून विकत आणावी लागते. यामुळे कधी कधी रुग्णांना वेळेवर औषधी मिळणे शक्य होत नाही.
घाटी रुग्णालयातील सुविधांबद्दल तसेच रुग्णालयात असलेल्या अनेक रिक्त पदांबद्दल खासदार इम्तियाज जलील यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात जनहित याचिका दाखल केली आहे या याचिकेवरील सुनवाईदरम्यान काल खंडपीठाने देखील घाटी रुग्णालय फक्त पोस्टमार्टम करण्यासाठीच आहे, त्या ठिकाणी मानवी जीवाशी खेळ होत असल्याची खंत व्यक्त केली. तसेच घाटी रुग्णालयात औषधींचा पुरवठा अतिशय अनियमित अनिश्चित होत असल्याने सतत तुटवडा निर्माण होत आहे यामुळे घाटी रुग्णालयाच्या बाजूला फूटपाथवर दर दोन ते तीन दिवसांनी एक नवीन मेडिकल स्टोअर पाहायला मिळते आज घडीला सुमारे २५ ते ३० मेडिकल स्टोअर्स त्याठिकाणी आहेत असे खासदार इम्तियाज जलील म्हणाले.‌ ज्या घाटी रुग्णालयावर महाराष्ट्रातील सुमारे १४ जिल्ह्यातून रुग्ण येतात त्या घाटी रुग्णालयात औषधींचा तुटवडा असून अनेक मूलभूत सुविधांचा अभाव आहे असे असताना दुसरीकडे शासन मात्र नवनवीन रुग्णालय बांधण्याचे निर्णय घेत आहे.