जनतेज न्युज

हिंदू – मुस्लिम एकतेचे प्रतिक, जालिंदरनाथ महाराजांचा यात्रोत्सव

प्रतिनिधी , जळगाव : सालाबादप्रमाणे थाटात पार पडणारे हिंदू- मुस्लिम एकतेचे प्रतीक असलेला जालिंदरनाथ महाराजांचा यात्रोत्सव मार्गशीर्ष महिन्याच्या अमावस्येला म्हणजेच दि २३ रोजी होत आहे. यानिमित्त गावात मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली असून उत्साहाचे वातावरण आहे. गोराडखेडा हे गाव पाचोरा शहरापासून अवघ्या तीन किलोमीटर अंतरावर आहे. गावातील धार्मिक वृत्ती व परंपरा या कमालीच्या आहेत. त्यामुळे गावाने परिसरात एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. साधारण चार हजार लोकसंख्या असणाऱ्या या गावाची ओळख जेवढे पैलवानांचे गाव म्हणून आहे. त्यापेक्षा अधिक जालिंदरनाथ महाराजांच्या (जलालशा बाबांच्या) दर्ग्यामुळे आहे. समस्यांना दूर करून सुख समृद्धी देणारा हा दर्गा भाविकांचे श्रद्धास्थान बनले आहे. तीनशे वर्षाची परंपरा:- हिंदू मुस्लिम भाविकांना एकत्र आणणारा जलालशा बाबांचा यात्रोत्सव साधारण ३०० वर्षापासून साजरा करण्यात येत असून या ठिकाणी संपूर्ण राज्यातून येणारे भाविक आपल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी नवस बोलतात व ती पूर्ण झाल्यावर तो फेडतात. याप्रसंगी हिंदू बांधव मुस्लिमांच्या तर मुस्लिम बांधव हिंदूंच्या नवसात सहभागी होतात व प्रसादाचे जेवण करतात.संदल (तगतराव) मिरवणूक प्रथा:- यात्रेच्या पूर्वसंध्येला गोराडखेडा बु व गोराडखेडा खुर्द पंचमंडळी व प्रतिष्ठितांच्या मार्गदर्शनाने संदल मिरवणूक काढण्यात येत असते. मिरवणूक ढोल ताशांच्या गजरात बाबांच्या दर्ग्यापर्यंत येतात व दर्ग्यावर शाल चढवण्यात येते. यात मोठ्या संख्येने हिंदू मुस्लिम भाविक सहभागी होतात. गोड भाताचा नवस:- यात्रेच्या दिवशी गावातील घराघरातून गोड भात बनवून त्याचा प्रसाद बाबांना चढवण्यात येत असतो. बाहेरगावाहून येणारे भावीकही येथे गोड भाताचा नवस बोलतात व फेडतात. प्रसंगी गोड भात प्रसाद म्हणून वाटला जातो. यात्रेचे नियोजन व बंदोबस्त:- गावात मोठ्या संख्येने येणारे भाविक लक्षात घेता कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून ग्रामपंचायत बु व ग्रामपंचायत खुर्द तसेच देवस्थान मंडळ यांच्यामार्फत नियोजन करण्यात येते. तसेच पाचोरा पोलीस स्टेशन मार्फत बंदोबस्त पाडण्यात येत असतो.यावर्षी यात्रेनिमित्त दि.२२ रोजी सायंकाळी पाच वाजता संदल मिरवणूक काढण्यात आली असून दि.२३ रोजी यात्रा संपन्न होणार असून त्यानिमित्त गोरारखेडा बु येथे सोपान कोळी दोणगावकर व गोराडखेडा खुर्द येथे मास्टर रतनभाऊ चि. सोमनाथभाऊ नगरदेवडेकर यांचा लोकनाट्य तमाशा मंडळाचे आयोजन करण्यात आले आहे. तर कव्वाली कार्यक्रमासाठी कव्वाल शाकीर-जाकिर यांची जुगलबंदी रंगणार आहे. तसेच कुस्त्यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी परिसरातील भाविकांनी यात्रेनिमित्त बाबांच्या दर्शनाचा व आयोजित कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन हिंदू मुस्लिम एकता उरूस कमिटी व ग्रामपंचायत मार्फत करण्यात आले आहे.