जनतेज न्युज

IFSC हवं असेल तर श्वेतपत्रिका काढा- सुधीर मुनगंटीवार

प्रतिनिधी , मुंबई : केंद्र सरकारने मुंबईतील आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील गांधीनगर येथे हे कार्यालय असणार आहे. यावरून महाराष्ट्रातील राजकीय नेत्यांनी पंतप्रधानांवर टीका केली आहे. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र सरकारच्या स्मरणशक्तीला लक्ष्य करून, काही लोकांची स्मरणशक्ती फार सोयीची आहे. ते कोणत्याही गोष्टींचा दोष पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारला देतात, असे म्हणत या निर्णयाची तपशीलवार माहितीदेखील दिली आहे. त्यानंतर भाजपाचे नेते, माजी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सत्ताधारी आघाडी सरकारवर टीका करत IFSC हवं असेल तर श्वेतपत्रिका काढा, असा टोला हाणला आहे.
तसेच, त्यावेळी भाजपसोबत सत्तेत असणाऱ्या शिवसेनेच्या भूमिकेवरही मुनगंटीवारांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला का हलवण्यात आले, याची कारणं शोधण्याचा सल्ला देत गेल्या दोन वर्षांमध्ये राज्य सरकारने केलेला पत्रव्यवहार सर्वांसमोर आणा, असं आव्हान मुनगंटीवार यांनी दिलं.
आयएफएससी केंद्र गांधीनगरला जाण्यावरून काँग्रेसचे नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांच्याशी एका वृत्तवाहिनीने संवाद साधला. त्यावेळी मुनगंटीवारांनी हे विधान केले.