प्रतिनिधी , बीड : बीड तालुक्यातील वानगाव इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेत पूर्णवेळ शिक्षक नाही. परिणामी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होतंय. त्यामुळे आज संतप्त पालकांनी आपल्या पाल्यांना घेऊन थेट जिल्हा परिषदेच्या आवारातच शाळा भरवली आहे. यावेळी या विद्यार्थ्यांच्या हातातील फलकांनी लक्ष वेधून घेतलं. वाणगाव येथे पहिली ते सातवीचे वर्ग असून एकूण पाच शिक्षकांपैकी केवळ दोन शिक्षक कार्यरत आहेत. त्यातील एकच शिक्षकावर सर्व शाळेचा कारभार सुरू आहे. त्यामुळे या शाळेला पूर्णवेळ आणि शिक्षक संख्या वाढवून द्यावी. अशी मागणी करण्यात आली. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची शिष्टमंडळाने भेट घेतली. भेटीदरम्यान लवकरच या ठिकाणी शिक्षकाची नेमणूक केली जाईल, असा आश्वासन मुख्य अधिकाऱ्यांनी दिले आहे.
