जनतेज न्युज

जुनी पेन्शन योजना लागू करण्याच्या मागणीसाठी शिक्षकांचे जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे आंदोलन

प्रतिनिधी, अमरावती : अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या विविध प्रश्नांसाठी व न्याय हक्कासाठी राष्ट्रव्यापी आंदोलन उभारण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी, या मुख्य मागणीला घेऊन अन्य प्रश्नांसाठी आगामी हिवाळी अधिवेशनात आंदोलन करण्यात येणार असल्याचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनातुन दिला आहे.
अखिल महाराष्ट्र प्राथमिक शिक्षक संघाच्या म्हणण्यानुसार अनेक वर्षांपासून शिक्षकांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहेत. असंघटित पणाचा फायदा घेऊन भूतकाळात लढ्याने मिळालेल्या सुविधा शासन हिरावून घेत आहेत. जुनी पेन्शन योजना बंद केली, त्यानंतर शिक्षकाचा शिक्षण सेवक झाला आहे. शासकीय शाळांच्या खाजगीकरणाचा हा एक डाव असल्याचे प्राथमिक शिक्षक संघाचे म्हणणे आहे. शिक्षकांच्या अनेक प्रश्न शासन स्तरावर प्रलंबित आहेत. यामध्ये जुनी पेन्शन योजना लागू करणे, शिक्षण सेवक योजना रद्द करून नियमित शिक्षकांची नेमणूक करणे, नवीन शैक्षणिक धोरणातील शिक्षक व शिक्षक विरोधी तरतुदी काढून टाकण्यात याव्या, तसेच शिक्षकांकडील अशैक्षणिक कामे कमी करावी, शिक्षकांना मुख्यालयीन राहण्याचे आदेश रद्द करावे. त्याच सोबत शिक्षक जिल्हा अंतर्गत बदली प्रक्रिया तत्काळ राबविण्यात यावी, प्राथमिक शिक्षक, विषय शिक्षक, केंद्र प्रमुख तसेच शिक्षण विभागातील प्रशासकीय पदे तत्काळ भरण्यात यावी, यासारख्या अन्य मागण्यांसाठी अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ राज्याच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.