जनतेज न्युज

नेर-अमरावती मार्गावरील खड्ड्यामुळे विद्यार्थ्यांना अपघाताची भीती; आठ हजार विद्यार्थ्यांनी घातले नितिन गडकरींना पत्राद्वारे साकडे

प्रतिनिधी, यवतमाळ : राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनेतून बेदखल असलेल्या यवतमाळ अमरावती रस्त्यांवर खड्यांमुळे अपघाताचे प्रमाण वाढत आहे.यातच अपघातात पुढचा नंबर आमचा तर नाही ना ? असा भीती विद्यार्थ्यांना सतावत आहे. यवतमाळ अमरावती जिल्ह्यातील आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून पुढचा नंबर आमचा तर नाही ना, अशी भीती व्यक्त केली आहे. तीन राज्यांना जोडणारा यवतमाळ अमरावती महामार्ग सध्या मृत्यू मार्ग म्हणून शिल्लक राहिला आहे. या मार्गावर असणाऱ्या यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यातील तब्बल ३४ शाळेतील विद्यार्थ्यांनी ८ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरींना पत्राद्वारे भावनिक साद घातली आहे.उत्तर व दक्षिण कॉरीडोर जोडण्याच्या हेतूने महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशच्या राज्यसीमेवरील अमरावती जिल्ह्यातील धामणी तालुक्यातील भोकरबर्डी या गावापासून हरिसाल,सिमाडोह ,परतवाडा,अमरावती ,बडनेरा ,नांदगाव खंडेश्वर ,नेर ,यवतमाळ ,उमरी पासून पांढरकवडा तालुक्यातील करंजी पर्यंत हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग प्रस्तावीत होता.मात्र राजकीय पुढाऱ्यांच्या दुर्लक्षित धोरणामुळे हा मार्ग अद्याप पूर्ण झाला नाही. या मार्गावरील येणाऱ्या ३४ शाळा महाविद्यालयांच्या विद्यार्थ्याना दररोज प्रवास करावा लागतो.जीव मुठीत घेऊन घरातून शाळेतून जावे लागते.त्यामुळे अखेर दोनही जिल्ह्यातील तब्बल आठ हजार विद्यार्थ्यांनी थेट केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील सावरकर नगर येथील जनसंपर्क कार्यालयाच्या पत्त्यावर पत्र लीहले आहे. यामधे विद्यार्थ्यांनी खड्डेमय रस्त्यावर दररोज प्रवास करतांना होत असलेल्या त्रास आणि भीती बद्दलची व्यथाच मांडल्या.