प्रतिनिधी, धुळे : एका कारमधून होणारी गावठी पिस्टल व काडतुसांची तस्करी रोखण्यात धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांना यश आले आहे. सिनेस्टाईल पाठलाग करून चिलारे गावाजवळ या कारला थांबवून चौघा संशयितांना पथकाने ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन गावठी पिस्टलसह चार जीवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. शिरपूर तालुका पोलिसांच्या या कामगिरीचे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी कौतुक केले.
यासंदर्भात धुळे जिल्हा पोलीस अधीक्षक प्रवीणकुमार पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सपोनि सुरेश शिरसाठ यांना गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, रोहीणी भोईटी गावाकडुन शिरपुरच्या दिशेने जाणाऱ्या एका कार नंबर MH १३ BJ ९००१ मध्ये चार इसम गावठी कट्टे घेवुन जात आहेत. त्यानुसार शिरपूर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुरेश शिरसाठ यांनी लागलीच पथकाला आदेशीत करून कारवाईची सुचना केली. यावेळी रोहीणी भटाई गावाकडे जात असताना पथकाला समोरुन संशयित वाहन कार येताना दिसली. त्यास थांबण्याचा इशारा केला असता वाहन चालकाने वाहन न थांबवता शिरपुरच्या दिशेने वेगाने कार पळवली. या कारचा सिने स्टाईल पाठलाग करून तिस चिलारे गावाजवळ थांबविण्यात आले. गाडीत बसलेल्या इसमांची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोसई भिकाजी पाटील व पोसई संदीप पाटील यांनी चौकशी केली असता त्यांनी त्यांची नावे राहुल विष्णु शिंदे रा. मातंगनगर शुक्रवार पेठ, तुळजापुर जि. उस्मानाबाद, अमोल रविंद्र कोरडे, रा. आनंदनगर, हडको ता तुळजापुर जि. उस्मानाबाद, ओमकार गणेश स्नदिवे, रा. जिजामाता नगर हडको, तुळजापुर जि. उस्मानाबाद, सुरज महताब शेख, रा. आरळी (बु) जि. उस्मानाबाद यांना ताब्यात घेतले.
यावेळी गाडीच्या गिअर दांडीच्या जवळ असलेल्या फायबर पार्टचे आडोश्यामध्ये लपवून ठेवलेल्या ५० हजार रूपये किंमतीचे दोन गावठी पिस्टलसह मॅगझीन, ४ जीवंत काडतुस मिळुन आले. या कारवाईत ८ लाखाच्या कारसह ५२ हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी पोना. संदिप ठाकरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांवर आर्म ॲक्ट अंतर्गत चौघान विरोधात शिरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोसई भिकाजी पाटील यांना सोपविण्यात आला आहे.
