प्रतिनिधी , नागपूर : गोड गुलाबी थंडीची चाहूल सर्वत्र जाणवू लागली असून तापमानामध्ये देखील कमालीची घट झाली आहे. नागपुरातील तापमान गेल्या दोन दिवसापासून 13°-15° सेल्सिअसपर्यंत घसरल्याने रात्रीच्या वेळी थंडी अधिक जाणवू लागली आहे. माणसाप्रमाणे मुक्या जनावरांना देखील थंडीची तीव्रता जाणवत असते. नागपुरातील महाराज बागेतील प्राण्यांसाठी थंडीपासून संरक्षणासाठी विशेष काळजी घेतली जात आहे.थंडीचा कडाका चांगलाच जाणवू लागला आहे. महाराज बागेतील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. वातावरणातील आणि ऋतूमध्ये होणाऱ्या बदलाचा परिणाम प्राण्यांवर होतो. यामुळे प्रशासनाकडून उपाययोजना राबवून त्यांचे पालन पोषण करण्यात येत आहे. पशुपक्षांना नैसर्गिक ऊब मिळावी, यासाठी प्रयत्न केले जात आहेत. प्राण्यांना थंडीचा त्रास होऊ नये यासाठी हिटर देखील लावण्यात आले आहेत.रात्रीच्या वेळी गार वारा आणि थंडी लागू नये म्हणून पिंजऱ्याभोवती ग्रीन मॅट लावली आहे. तसेच नैसर्गिक अधिवासात उब मिळावी यासाठी वाळलेला पालापाचोळा, लाकडी फळी इत्यादी ठेवण्यात आले आहे. यासह छोट्या पिंजऱ्यात प्राण्यांना बसण्यासाठी लाकडी टेबल ठेवण्यात आलेले आहेत. बिबट्या, वाघ, अस्वल, यासह पक्षांच्या पिंजऱ्यात हिटरची सुद्धा व्यवस्था करण्यात आली असल्या माहिती महाराज बागेचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांनी दिली.
