प्रतिनिधी, ठाणे : भाजपाच्या वतीने विभाजन विभीषीका स्मृती दिनानिमित्ताने ठाणे शहरात जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली इंदिरानगर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करून लोकमान्यनगरपर्यंत मोर्चा निघाला. त्यानंतर फाळणीदरम्यान मृत्यूमुखी पडलेल्या हजारो भारतीयांना श्रद्धांजली अर्पण करून मूक मोर्चाचा समारोप करण्यात आला.देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी १४ ऑगस्ट रोजी देशाची फाळणी झाली होती. या फाळणीमध्ये अनेकांना बेघर व्हावे लागले, अनेकजण आपले सर्व घरदार सोडून भारतात परतले होते. त्यात हजारो नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे या फाळणीच्या वेदना कायम असल्याने भाजपच्या वतीने विभाजन विभीषीका स्मृती दिन पाळून इंदिरानगर येथे मूक मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात भाजपा कार्यकर्त्यांबरोबरच शेकडो नागरिक सहभागी झाले होते. इंदिरानगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. त्यानंतर लोकमान्यनगर येथे मोर्चाचा समारोप करण्यात आला. या ठिकाणी ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी फाळणीवर भाषण केले. या भाषणात त्यांनी फाळणीपूर्व स्थिती व फाळणीनंतरचे देशावर झालेले परिणाम यावर भाष्य केले. त्यानंतर फाळणीमध्ये हुतात्मा पत्करलेल्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. या मोर्चामध्ये भाजपाचे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले, आमदार संजय केळकर आणि आमदार निरंजन डावखरे यांच्याबरोबरच माजी नगरसेवक मुकेश मोकाशी, भरत चव्हाण, राजकुमार यादव, परीवहन सदस्य विकास पाटील भाजयुमोच्या माजी कोकण सहसंयोजिका वृषाली वाघुले-भोसले, भाजपाचे पदाधिकारी, मंडल पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांबरोबर नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
