प्रतिनिधी , पुणे :-लॉकडाऊन काळात ऊसतोड कामगारांप्रमाणे स्पर्धा परीक्षार्थ्यांना घरी जाण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी एमपीएससी समन्वय समितीने केली आहे. त्यासाठी समितीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजित तांबे यांना निवेदन पाठवलं आहे.
लॉकडाऊनमुळे स्पर्धा परीक्षार्थ्यांना घरी जाता आलं नाही. त्यातच हॉटेल्स, मेस बंद असल्याने जेवणा-खाण्याची समस्या आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे हाल होत असून, कुटुंबीयही काळजी करत आहेत. त्यामुळे ऊसतोड कामगारांना लावलेला निकष विद्यार्थ्यांना लावावा, अशी मागणी एमपीएससी समितीने केली आहे. पुण्यात साधरणतः दोन हजार विद्यार्थी असल्याचा दावा या समितीचा आहे.
कोरोनामुळे राज्यातील परिस्थिती बिकट आहे. ३ मेपर्यंत लॉकडाऊन असला तरी त्यानंतरही खबरदारी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे जर विद्यार्थी घरी असले तर त्यांच्या पोटापाण्याची व्यवस्था होईल, असं समितीचं म्हणणं आहे. त्यामुळे सरकारने योग्य विचार करून विद्यार्थ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी या समितीने केली आहे.
