प्रतिनिधी ,धुळे: उत्तर प्रदेशातील हाथरस येथे युवतीवर सामूहिक बलात्कार करणा-या नराधमांना फाशी द्यावी. पिडीत तरुणीचे अंत्यसंस्कार कुटूंबियांच्या परस्पर मध्यरात्री करणा-या पोलिसांवर व तपासी अधिका-यांवर 302 चा गुन्हा दाखल करावा. या घटनेची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिसदस्यीय निवृत्त न्यायाधिशांकडे द्यावी व यामध्ये किमान एका महिला न्यायाधिशांचा समावेश असावा. तसेच पिडीत कुटूंबाचे पुर्नवसन महाराष्ट्रात करावे. हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात उत्तर प्रदेशच्या बाहेर चालवावा. अशी मागणी करत आज धुळ्यात वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने सफाई आक्रोश मोर्चा काढण्यात आला.
धुळे शहरातील संतोषी माता चौक ते धुळे जिल्हाधिकारी कार्यालय पर्यंत ह्या मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात धुळे शहरातील सर्वपक्षीय पदाधिकारी व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पीडित तरूणीला न्याय मिळालाच पाहिजे, आरोपींना फाशी द्या, योगी सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देण्यात आल्या. वाल्मिकी मेहतर समाजाच्या वतीने काढण्यात आलेल्या या आक्रोश मोर्च्यात सर्वपक्षीय नागरिक, आंबेडकरी, अल्पसंख्यांक व दलित पक्ष संघटना यांच्या वतीने काढण्यात आलेल्या सफाई आक्रोश मोर्च्यात मोठ्या संख्येने उपस्थित होते.
