जनतेज न्युज

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या पूरस्थितीची पाहणी करायला केंद्राचे पथक आज नागपुर जिल्ह्यात दाखल,नुकसानग्रस्त भागाची पाहणी सुरू.

प्रतिनिधी , नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस झालेल्या पूरस्थितीची पाहणी करायला केंद्राचे पथक आज नागपुर जिल्ह्यात दाखल झाले आहे. केंद्रीय कृषी मंत्रालयाचे संचालक आर. पी. सिंग आणि केंद्रीय CGO विभागाचे अधीक्षक अभियंता महेंद्र सहारे यांच्या नेतृत्वात पथकाने आज कामठी तालुक्यातील गुमथाळा या गावात जाऊन भेट दिली आणि प्रत्यक्ष शेतात जाऊन शेतकऱ्यांकडून पूरपरिस्थितीची माहिती घेतली. यावेळी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेत केंद्रीय पथकाला झालेल्या नुकसानीची आणि त्यानंतर आलेल्या आर्थिक संकटाची परिस्थिती सांगितली. तसेच आम्हा पीडित शेतकऱ्यांचे सरकारने पुनर्वसन करावे, अशी मागणी केली. केंद्रीय पथकातील दोन सदस्यांनी अतिशय शांतपणे शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेत नुकसानीची नोंद केली. या पथकाने कामठीसह परशिवनी आणि मौदा तालुक्यातही झालेल्या नुकसानीची पाहणी केली. यावेळी नागपूरचे जिल्हाधिकारी,तहसीलदार उपस्थित होते. नागपूरसह पूर्व विदर्भात ऑगस्ट महिन्यात झालेल्या पूरस्थितीमुळे नागपूर जिल्ह्यातील पाच तालुक्यात 61 गावे बाधित झाली होती. तर नागपूर विभागातील 14 तालुक्यातील 90 हजार 858 नागरिक यामुळे बाधित झाले होते. या पार्श्वभूमीवर केंद्राची चमू नागपूर विभागाच्या दौऱ्यावर आली आहे. आज केंद्राच्या विविध 3 पथकांतर्फे पूर्व विदर्भातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जात असून पहिल्या पथकांतर्फे नागपूर-भंडारा तर दुसरे पथक गडचिरोली आणि तिसरे पथक चंद्रपूर जिल्ह्यात नुकसानग्रस्त भागाची पाहणी करीत आहे.