प्रतिनिधी , मुंबई : कंगना राणावतने मागील काही महिन्यात मुंबई पोलीस आणि महाराष्ट्राची बदनामी केली आहे. त्यामागे तिचे शब्द आणि एकूणच त्यासाठीचे कारस्थान हे भाजपचे नेते करत होते, ते आता उघड झाले आहे. असा दावा काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. सचिन सावंत म्हणाले, कंगनाने काल ज्याप्रमाणे ट्विट केले आणि त्यातून मागील काळात तिने महाराष्ट्राची बदनामी केली. तसेच मुंबई पोलिसांचा माफिया म्हणून उल्लेख केला तसेच मुंबईला पाकव्याप्त काश्मीर संबोधले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख हा तिच्याकडून सतत केला जात होता. त्यामागे भाजपने कारस्थान रचले होते, ते कंगनाच्या माध्यमातून केले जात होते हे आता सिद्ध होत आहे. त्यामुळे तिला भाजपने तिला यावर बोलण्यासाठी पाठवले होते हेही यातून दिसून येते, असा दावाही सावंत यांनी केला. तसेच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे याविषयी बोलताना ते म्हणाले की, याबाबत काही कल्पना नाही माध्यमातुन तशी चर्चा होत आहे. अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी दिली.
