प्रथिनिधी, सोलापूर :
पतीच्या निधनानंतर पतीच्या अंत्यविधी वेळी पत्नीच्या कपाळाचे कुंकू पुसणे, गळ्यातील मंगळसूत्र तोडणे आणि पायातील जोडवी काढणे अशा अनिष्ट प्रथा बंद करून विधवा महिलांबद्दल परंपरागत चालू असलेली कुप्रथा तात्काळ बंद करावी, असा ठराव करमाळा तालुक्यातील पोथरे गावातील ग्रामसभेत मंजुर केला आहे.
करमाळा तालुक्यातील पोथरे येथे विधवा प्रथा बंद करणे साठी सरपंच धनंजय झिंजाडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. या ग्रामसभेत कायद्याने प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जीवन जगण्याचा अधिकार दिला असतानाही विधवा महिलांना सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी करून घेतले जात नाही एवढेच नाही तर त्यांना वेगळी वागणूक देत त्यांचा अवमान केला जातो. या अनिष्ट रूढी बंद करून विधवा महिलांचा सन्मान व्हावा, यासाठी शासनाकडे विधवा महिला सन्मान कायदा करण्यासाठी सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आला आहे. यावेळी गटविकासधिकारी मनोज राऊत, पोलीस निरीक्षक सूर्यकांत कोकणे ग्रामविकास अधिकारी हरिभाऊ दरवडे, उपसरपंच अंकुश शिंदे आदी उपस्थित होते.
