प्रथिनिधी, वर्धा : आर्वी येथील एका व्यक्तीला सोने घालून फिरणे भोवले असून त्याला लुटून पैसे व त्याच्याजवळ असलेले सोन्याच्या चेन,अंगठ्या सह मुद्देमाल पळवून नेत व्यक्तीला विहिरीत दुचाकी सह ढकलून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे,,मृत व्यक्ती आर्वी नगरपालिकेतील स्वच्छता विभागातील कर्मचारी असल्याचं सांगण्यात येत आहे. महिंद्र रामरावजी शिंगाणे असे मृत पालिका कर्मचाऱ्याचे नाव आहे..महिंद्र हा 25 मे पासून घरून बेपत्ता असल्याने त्याच्या कुटुंबीयांनी त्याचा शोध घेतला, पण तो मिळून न आल्याने अखेर महिंद्राच्या कुटुंबीयांनी घरून बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. तक्रारीवरून पोलिसांनी सुरुवातीला मिसिंग ची नोंद घेतली त्यानंतर एक जूनला पोलिसांना महिंद्र ची हत्या झाल्याचा संशय आल्याने पोलिसांनी आपल्या तपासाला गती दिली. पोलिसांनी १ जूनला सुरुवातीला काही व्यक्तींना ताब्यात घेत अधिकची विचारपूस केली. त्यानंतर महिंद्रची हत्या झाल्याचे पुढे आले.. पण रात्री आठ वाजले तरी पोलिसांना महिंद्राचा मृतदेह गवसला नव्हता. अखेर संशयितांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी एका विहिरीची बारकाईने पाहणी केली. मध्यरात्री 3 वाजताच्या सुमारास महिंद्रचा मृतदेह विहिरीत आढळला. पोलिसांनीही परिसरातील नागरिकांच्या मदतीने महिंद्र चा मृतदेह बाहेर काढून पंचनामा करीत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आर्वी येथील उपजिल्हा रुग्णालयात पाठवला. याप्रकरणी आर्वी पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरणासह मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
