जनतेज न्युज

कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी सरपंच उपसरपंच सदस्य अपात्र घोषित

प्रतिनिधी, यवतमाळ : पुसद तालुक्यातील हुडी (बु) येथील सरपंच, उपसरपंच आणि एका सदस्याला कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले. पंचायत समितीच्या इतिहासातील ही पहिलीच घटना ठरली आहे.हुडी ग्रामपंचायतीच्या सरपंच अनुराधा कान्हेकर, उपसरपंच संतोष भगवान कांबळे व सदस्य दिलीप सिताराम कांबळे या तिघांना कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी विभागीय आयुक्तांनी अपात्र घोषित केले आहे. तसेच शासकीय योजनेच्या १४ लाख रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन ग्रामसचिव अनिता दिगंबर आगाशे यांच्याविरुद्ध विभागीय चौकशी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले आहेत. विशेष म्हणजे एप्रिल महिन्यात ग्रामसचिव यांच्याविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेने पुसद तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.