प्रतिनिधी, कल्याण : भले मोठे झाड कोसळून आई आणि तिचा आठ वर्षाचा मुलगा जखमी झाल्याची दुर्दैवी घटना कल्याण पश्चिमेकडिल ठाणगे वाडी परिसरात घडली. या दुर्घटनेत मुलाचा उजवा पाय फॅक्चर झाला असून आईला सुध्दा गंभीर दुखापत झाली आहे.सुदैवाने दोघांचे प्राण वाचले. दोघावर कल्याण मधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेज परिसरात राहणारी सुनिता भांगरे ही महिला तिचा मुलगा भाविक याला शाळेतून घेण्यासाठी गेली होती. शाळेतून मुलाला घेऊन येत असताना आई सुनिता व मुलगा भाविक रस्त्यावरुन जात असताना ठाणगेवाडी परिसरात भले मोठे झाड अचानक कोसळले. यात आई आणि मुलगा दोघे गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरीकांनी झाड बाजूला करुन दोघांना बाहेर काढले. दोघांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. आई आणि मुलगा दोघांवर रुग्णालयात उपचार सुरु आहे. रस्त्याच्या बाजूला कोसळण्याच्या स्थितीत असलेली झाडे महापालिकेने हटवन्याची मागणी जात आहे.
