प्रतिनिधी, यवतमाळ : बाभूळगाव तालुक्यातील गळव्हा येथे समाज मंदिरासाठी जागा मिळावी, या मागणीसाठी महिलांनी उपोषण सुरू केले होते. मात्र,पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना वाहनात कोंबून पोलिस ठाण्यात आणले. गावातील नागरिकांकडूनही धमक्या दिल्या जात आहे. न्याय मिळेपर्यंत गावात पाय जाणार नाही, असा पवित्रा गळव्हावासींनी घेतला आहे.गळव्हा येथे दीड वर्षापूर्वी ग्रामपंचायतीच्या जुन्या इमारत परिसरात पंचशील ध्वज लावण्यात आला होता. त्यासाठी ग्रामपंचायतीकडे अर्ज केला होता. उपोषणकर्त्या महिलांवर झालेल्या अन्यायाची सखोल चौकशी करण्यात यावी, यवतमाळ ग्रामीण पोलिसांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नागरिकांसोबत कुठल्याही प्रकारची जबरदस्ती करण्यात आली नाही, कायदेशीर कारवाई करण्यात आली, अशी माहिती ठाणेदार किशोर जूनघरे यांनी दिली.
