प्रतिनिधी , बीड : बीड जिल्ह्यातील एक वेगळी बातमी समोर येत आहे. आपल्या मुलांच्या शिक्षणासाठी गावातील चौथी पर्यंत असणाऱ्या शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करण्यात यावा या मागणीसाठी पालकांवर उपोषण करण्याची वेळ आली आहे. गेवराई तालुक्यातील मौजे सिरसदेवी येथील जिल्हा परिषदेची प्राथमिक केंद्रीय शाळा ही इयत्ता चौथ्या वर्गापर्यंत आहे. पाचव्या वर्गाला मान्यता मिळावी यासाठी ग्रामपंचायत, शालेय व्यवस्थापन समिती, तसेच पालकांनी मागील काही दिवसांपासून प्रशासनाकडे पाठपुरावा केलेला आहे.
मात्र या पाठपुराव्याला कोठेही यश आलेले नाही. याच शाळेमध्ये इयत्ता चौथीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेण्यासाठी पायपीट करत नॅशनल हायवे ओलांडून दुसऱ्या शाळेत जाण्याची वेळ येतआहे. त्यामुळे गावातील याच शाळेमध्ये पाचवीचा वर्ग चालू करावा, अशी मागणी गावकऱ्यांकडून प्रशासनाकडे वारंवार करण्यात येत होती.
परंतु प्रशासनाने या मागणीकडे संपूर्ण दुर्लक्ष केल्याने शेवटी आपल्या मुलांचे शैक्षणिक वर्ष वाया जाऊ नये व लवकर गावातील जिल्हा परिषदेच्या शाळेत पाचव्या वर्गाला मान्यता मिळावी यासाठी पालकांसह विद्यार्थ्यांनी गटशिक्षणाधिकारी कार्यालयासमोर उपोषण सुरू केले आहे.
जिल्हा परिषद शाळेत पाचवीचा वर्ग सुरू करण्याच्या मागणीसाठी उपोषण करावे लागते, ही एक लाजीरवाणी गोष्ट असुन आम्ही वारंवार मागणी करून देखील आमच्या मागणीला प्रशासन दाद देत नाही. मग सदरील प्रशासन कुणाचे दबलेले आहे की काय, असा प्रश्न उपोषण कर्त्यांनी उपस्थित केला आहे. तर गटशिक्षणाधिकारी कार्यालयात हजर नसल्याने आमच्या मागणी पुर्ण होतं नाही. तोपर्यंत उपोषण चालु राहणार असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे.
