जनतेज न्युज

जिल्ह्याची ऊसतोड कामगारांची ओळख मोडून जिल्हयाचे मागासलेपण दूर करणार – धनंजय मुंडे

…तर पुढील अनेक वर्ष चांगल्या कामासाठी आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील – पंकजा मुंडेंच्या शुभेच्छांना धनंजय मुंडेंचे उत्तर

प्रतिनिधी , बीड : माजी पालकमंत्री यांनी दिलेल्या शुभेच्छा घेऊन जिल्ह्यात येत्या चार वर्षात विकासाचे असे काम करू, की पुढील अनेक वर्ष त्यांना आम्हाला शुभेच्छा द्याव्या लागतील असे विधान बीड जिल्ह्याचे पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी केले. संत वामनभाऊ महाराज यांच्या ४५व्या पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त पाटोदा तालुक्यातील गहिनीनाथ गड येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.
मागील सरकारच्या काळात ‘ब’ दर्जाचे तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या गहिनीनाथगडास मागील सरकारच्या काळात विविध विकास कामांसाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणा करण्यात आली होती परंतु प्रत्यक्षात फक्त दोन कोटी रुपये प्राप्त असल्याची कबुली माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दिली. रखडलेले २३ कोटी रुपये व अधिकचे ५ कोटी रुपये निधी राज्य सरकारच्या माध्यमातून या तिर्थक्षेत्राच्या विकासासाठी येत्या दोन वर्षात उपलब्ध करून देऊ असा शब्दही यावेळी बोलताना धनंजय मुंडे यांनी दिला आहे. ऊसतोड मजुरांचा जिल्हा ही ओळख पुसून टाकून सर्वाधिक ऊस पिकवणारा जिल्हा अशी ओळख निर्माण करून देणे आणि जिल्ह्याची मागासलेपण दूर करणे हा आपला निर्धार असल्याचे धनंजय मुंडे यांनी बोलून दाखवले.