प्रतिनिधी , यवतमाळ : यवतमाळ ग्रामीण भागातील सध्या शेतकऱ्यांना जीव मुठीत घेऊन रात्री जागली करीत सिंचन करावे लागत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. रात्री जग झोपले असतांना जगाचा पोशिंदा मात्र कुडकुडत्या थंडीत पिकांना पाणी देण्यासाठी रात्र जागून काढतोय. हे यवतमाळ जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शेतकऱ्यांचे वास्तव् जगणं आहे.
शेतकऱ्यांना सिंचन करताना अनेक धोके पत्करावे लागत आहे. शेतकऱ्यांना साप, विंचू शिवाय हिंस्त्र वन्यप्राणी यांच्याकडून हल्ला होण्याची सतत भीती असते. त्यात दिवसा सिंचन करतांना योग्य दाबाची वीज मिळत नाही. त्यामुळे कडाडणाऱ्या थंडीत शेतकऱ्यांना रात्री जागरण करीत शेतातील गहु आणि हरबरा या पिकांना पाणी द्यावे लागत आहे. नेर तालुक्यातील पिंपळगाव काळे या गावातील बहुतांश शेतकऱ्यांनी खरिपात लागवड केलेल्या कपाशीला बोन्ड अळीने पोखरल्याने त्यांना पीक उपटून फेकाव लागलं. त्याच शेतात काही शेतकऱ्यांनी पुन्हा उसनवारी करून कशीबसे करून रब्बीच्या पिकाची व्यवस्था केली. याच शेतकऱ्यापैकी एक शेतकरी म्हणजे दिवाकर चव्हाण त्यांनी 4 एकर शेतात हरभरा लावला आहे. मात्र, महावितरण कंपनीकडून मिळणाऱ्या चक्राकार पध्दतीच्या वीज पुरवठ्यामुळे त्यांना रात्री 12 नंतर शेतात सिंचनासाठी जावे लागत आहे. सध्या या भागात शेतीला वीज पुरवठा होत असतांना तीन दिवस दिवसा आणि चार दिवस रात्री असा चक्राकार पध्दतीने वीज पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, दिवसा मिळणाऱ्या विजेवर कमी दाबाची वीज मिळते, लाईन ट्रीप होणे यामुळे मोटार व्यवस्थित सुरू होत नाही. वारंवार वीज पुरवठा खंडित होत असल्याने रात्री ओलीत करावे लागत आहे. तर दुसरीकडे रात्री सिंचन करतांना तर ट्रान्सन्सफॉर्मर मध्ये फॉल्ट होणे, विजपम्प किंवा मेनस्विचमध्ये ओल्या हाथाने रात्री काम करणे शेतकऱ्यांच्या जीवावर बेतू शकते. त्यात शेतात सरपटणारे साप, विंचू शिवाय जंगली जनावरांकडून विशेषतः रानडुक्कर, बिबट या वन्य प्राण्यांकडुन शेतकऱ्यांवर हल्ला होण्याची सर्वाधिक भीती आहे. या सर्वांमुळे शेतकऱ्यांना अक्षरशः जीव मुठीत घेऊन रात्रीला सिंचन करावे लागत आहे. महावितरण चक्राकार पध्दतीने सिंचनासाठी वीज देते एकूणच आता कडाडणारऱ्या थंडीत शेतकरी रात्री जागली करून सिंचनाचा सोय करतोय. शेतकऱ्यानं समोरील धोके लक्षात घेऊन शेतकऱ्यांना योग्य दाबाची वीज दिवसा सुरळीत पुरवठा करणे आवश्यक आहे .
