प्रतिनिधी, कोहलपुर : जेवणाच्या ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरून मारहाण झालेल्या ओंकार माने रा. औरवाड ता. शिरोळ या पंचवीस वर्षीय तरुणाचा आज सकाळी सांगली येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाल्याने औरवाड येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
17 मे रोजी अनिमहंमद पटेल आणि ओंकार माने हे आलास येथील एका हॉटेलमध्ये जेवायला गेले होते. त्यावेळी जेवणाच्या ताटात रस्सा सांडल्याच्या कारणावरुन ओंकार शिकलगार, प्रकाश शिकलगार आणि कुलदीप संकपाळ यांच्याशी वाद झाला होता. दोन्ही गटाच्या हाणामारीत अनिम महंमद आणि ओंकार माने हे दोघे गंभीर जखमी झाले होते. पोलिसांनी तिघा मारेकर्यांना अटक केली आहे. ओंकारवर शस्त्रहल्ला झाल्याने त्याला उपचारासाठी सांगली येथे दाखल करण्यात आले होते. आज सकाळी नऊच्या सुमारास ओंकारचा मृत्यू झाला. मृत्यूची बातमी समजतात औरवाड गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आलास आणि मारेकऱ्यांच्या घराजवळ बंदोबस्त वाढवला आहे.
