प्रतिनिधी , मुंबई : मुंबई महामार्गावर असणाऱ्या घोटी टोल नाका येथे केंद्र शासनाच्या आदेशानुसार 15 जानेवारीपासून सर्व वाहनांना फास्ट टॅग अनिवार्य केलेली आहेत. सध्या इगतपुरी तालुक्यातील कोणत्याही नागरिकांकडून टोल आकारण्यात येत नाही परंतु 15 जानेवारीपासून इगतपुरीला जाणाऱ्या प्रत्येक स्थानिक नागरिकांकडून केवळ घोटी इगतपुरी अंतर पाच किलोमीटर असताना टोल आकारणी होऊ शकते.
इगतपुरी हे तालुक्याचे ठिकाण असल्यामुळे तहसील कार्यालय, पंचायत समिती कार्यालय, रेल्वे स्टेशन जंक्शन, न्यायालय, नगर परिषद, विपश्यना केंद्र देखील येथे आहे, तसेच भूमी अभिलेख कार्यालय, दुय्यम निबंधक कार्यालय व महावितरणचे कार्यालयही इगतपुरी येथे असल्यामुळे स्थानिकांकडून टोल आकारणी होऊ शकते. जमिनीचे फेरफार कामे व शासकीय कामे करण्यासाठी दररोज नागरिकांना कार्यालयांमध्ये चकरा माराव्या लागतात. तसेच घोटी बाजारपेठ व एस एम बी टी चे सुसज्ज हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी नागरिकांना वारंवार टोलनाक्यावरून जावे लागते. त्यामुळे टोल आकारणी सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारे नसल्यामुळे स्थानिकांना टोलमाफी मिळवून न्याय मिळवून द्यावा या आशयाचे निवेदन पालकमंत्री छगन भुजबळ यांना सरपंच सेवा संघाचे तालुकाध्यक्ष व माजी सरपंच हरिश्चंद्र चव्हाण यांनी दिले आहे. याप्रसंगी ग्रामपंचायत सदस्य अनिल भोपे, इगतपुरी मनसेचे शहराध्यक्ष सुमित बोधक, माजी सरपंच कैलास भगत, विनोद चव्हाण रामदास चव्हाण यांच्यासह स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
