प्रतिनिधी, ठाणे : संसदरत्न सुप्रिया सुळे यांना शिवीगाळ करणारे कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांच्याविरोधात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. सोमवारी राष्ट्रवादीचे राष्ट्रीय सरचिटणीस मंत्री डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी अब्दुल सत्तार यांच्या पुतळ्यास चप्पलांचा हार घालून तो जाळला. यावेळी डॉ.जितेंद्र आव्हाड यांनी,एका वृत्तवाहिनीशी बोलताना अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांना अत्यंत अश्लाघ्य अशी शिविगाळ केली आहे. सत्तार यांच्या या शिविगाळीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड संतप्त झाले. सोमवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते डाॅ.जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली तसेच ठाणे शहराध्यक्ष तथा ठाणे-पालघर जिल्हा समन्वयक आनंद परांजपे आणि ठाणे-पालघर विभागिय महिलाध्यक्षा ऋताताई आव्हाड यांच्या उपस्थितीत अब्दुल सत्तार यांच्याविरोधात ठाणे पक्ष कार्यालयासमोर जोरदार आंदोलन केले. यावेळी सत्तार यांच्याविरोधात कार्यकर्त्याकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. सत्तार ठाण्यात आले तर त्यांचे तोंड काळे करू, असा इशारा यावेळी देण्यात आला.
