प्रतिनिधी ,जळगांव – जळगांव जिल्ह्यातील पाळधी येथे एका तरुणीचा मृतदेह आढळुन आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. दोन दिवसांपुर्वी या तरूणीने गावातीलच एका तरूणासोबत प्रेम विवाह केला होता. मृत तरुणीच्या कुटुंबीयांनी तरुणीच्या सासरच्या मंडळीने तिचा घातपात केल्याचा आरोप केला असुन ,आरोपींना अटक होई पर्यंत मृतदेह न स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे.
पाळधी, ता. धरणगाव येथील आरती विजय भोसले ( वय १९) ही तरूणी ६ डिसेंबर २०२० पासून बेपत्ता झाली होती. दत्त जयंतीच्या दिवशी ती पाळधी गावातीलच प्रशांत पाटील या तरूणासोबत विवाह करून परतली. दरम्यान, या घटनेला दोन दिवस होत नाही, तोच आज सकाळी आरतीच्या आईला काही तरूणांनी त्यांच्या मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती दिली.
यानुसार त्यांनी सायलीच्या सासरी जाऊन पाहणी केली असता, तिचा मृतदेह संशयास्पदरीत्या आढळून आला. सासरच्या मंडळीने घातपात करून तिला मारून टाकल्याचा आरोप माहेरच्यांनी केला आहे. आरती विजय भोसले हिचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी जिल्हा रूग्णालयात आणला आहे. मात्र जोवर आरोपींना अटक होत नाही तोवर आपण मृतदेह स्वीकारणार नसल्याचा पवित्रा तिच्या माहेरच्यांनी घेतला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
