प्रतिनिधी , यवतमाळ : विवाह सोहळा म्हटले की, लाखोंचा खर्च, पाहुणे, बँड बाजा आलाच. यात दोन्ही कडील मंडळी खर्च करतात. मात्र, ना बँड, ना बारात, अवघ्या135 रुपयात विवाह पार पडू शकतो. आणि अनोखा विवाह सोहळा नोंदणी पद्धतीने पार पडला.
वधू मंगला संजय श्रीरामजिकर ही यवतमाळ तालुक्यात येणाऱ्या अकोला बाजार कामठवाडा येथील रहिवासी आहे तर वर राजेश बोरकर अमरावती येथील दस्तुरनगर येथील रहिवासी आहे. विशेष म्हणजे दोघेही मूक बधिर आहेत. नातेवाईकांनी पुढाकार घेऊन हा विवाह प्रसंग जुळवून आणला. विवाह सोहळ्याला मोठ्या प्रमाणात नातेवाईकांना न बोलावता मुलाकडील आई वडील, काका, काकू आणि मुलीकडील आई वडील, बहीण, भाऊ एवढीच मोजकी मंडळी उपस्थित होती. सर्व नातेवाईक नोंदणी कार्यालयात आले. आणि केवळ135 रुपये खर्च करून आयुष्यभराच्या गाठी बांधल्या गेल्या. विवाह सोहळ्यात लाखो रुपयांचा खर्च न करता साध्या पध्दतीने कार्यक्रम पार पडू शकतो हे बोरकर आणि श्रीरामजीकर परिवाराने दाखवून दिले आहे.
