प्रतिनिधी , राष्ट्रीय तपास यंत्रणेने (NIA) पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना अटक केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. हे प्रकरण स्थानिक आहे. मी त्यावर जास्त बोलणे योग्य ठरणार नाही, असे मोघम वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते रविवारी बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. सध्या मनसुख हिरेन मृत्यूप्रकरण आणि मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर मिळालेल्या स्फोटाकांनी भरलेल्या वाहन तपास प्रकरणामुळे महाविकासआघाडी सरकार अडचणीत आले आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी सचिन वाझे यांच्या अटकेविषयी प्रतिक्रिया विचारण्यात आली होती. तेव्हा शरद पवार यांनी यावर फार बोलण्यास स्पष्टपणे नकार दिला.
